संचालकांचा संदेश

संदेश

महाराष्ट्र तुरूंग विभागाला व्यावसायिकता आणि समाजाप्रती सेवेचा गौरवशाली इतिहास आहे. विभागाचा ध्वज सदैव उंचावलेला ठेवण्याप्रति आम्ही कटिबद्ध आहोत. गुन्हेगारी-न्याय यंत्रणेमधील एक महत्त्वाचा विभाग म्हणून आमच्या जबाबदारीची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आरोपी तसेच सुनावणी सुरू असणाऱ्या कैद्यांना राज्यातल्या विविध तुरूंगांमध्ये ठेवले जाते. सुधार प्रशासनानुसार आम्ही "सुधारणा आणि पुनर्वसन" या आमच्या ब्रीदवाक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षा पूर्ण केल्यानंतर कैद्यांना एक उपयुक्त नागरिक म्हणून वावरता यावे, यासाठी आम्ही त्यांनी शिक्षण घ्यायला प्रोत्साहन देतो तसेच उद्योग आणि शेतीची कौशल्ये आत्मसात करू देतो. महाराष्ट्र तुरूंग विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या ब्रीदवाक्याला वाहून घेतले आहे. आमच्यावर संपूर्ण विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांप्रति आणि समाजाप्रति आम्ही कृतज्ञ आहोत. सुधारणा आणि पुनर्वसन करण्याच्या कर्तव्याप्रति आम्ही कायम प्रामाणिक राहू. आमचे ध्येय गाठताना नागरिक, शैक्षणिक संस्था, अशासकीय संस्था आणि समाजसेवी संघटनांसह असलेल्या बांधिलकीची आम्हाला जाण आहे. चला तर, सुधारणा आणि पुनर्वसनाच्या सद्हेतूने एकत्रित प्रयत्न करू या!

 

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा,
महाराष्ट्र राज्य,पुणे